• मार्केट पोलिसांची कारवाई

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दुचाकी चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या एका तरुणाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रदीपकुमार श्रीराम चन्ने (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील मुलाल हुलकापूर गावचा रहिवासी असून, सध्या बेळगावमधील गांधीनगर येथील लक्ष्मी गल्लीत वास्तव्यास होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ८.२५ वाजता आरोपी मध्यवर्ती बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीजवळ लपून बसला होता. सार्वजनिक ठिकाणी उभी असलेली दुचाकी चोरण्याच्या उद्देशाने तो संधीच्या शोधात असल्याचा पोलिसांना संशय आला.

याचवेळी परिसरात गस्त घालणाऱ्या मार्केट पोलीस पथकाच्या निदर्शनास त्याच्या संशयास्पद हालचाली आल्या. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. याप्रकरणी कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ९६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.