- धावत्या एक्स्प्रेसमधून पडलेल्या प्रवाशाला क्षणार्धात वाचवले
- रेल्वे अधिकारी संगमेश कलबुर्गी यांचे कौतुक
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकावर एका रेल्वे अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. धावत्या एक्स्प्रेसमधून खाली पडलेल्या प्रवाशाला वेळीच मदत करून अधिकाऱ्याने त्याचे प्राण वाचवले. या घटनेमुळे रेल्वे अधिकाऱ्याच्या सतर्कतेचे आणि धाडसाचे कौतुक होत आहे.
१४ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३.३५ वाजण्याच्या सुमारास बेळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर हा प्रकार घडला. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसमधून उतरण्याच्या प्रयत्नात असताना एक प्रवासी तोल जाऊन खाली पडला. यावेळी धावती गाडी अंगावरून जाण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती.
याचवेळी कर्तव्यावर असलेले रेल्वे अधिकारी संगमेश कलबुर्गी यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाल केली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रवाशाला रेल्वे रुळांपासून सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत प्रवाशाला कोणतीही दृश्यमान दुखापत झाली नाही. त्यानंतर तो आपल्या नातेवाईकांसह सुखरूप घरी रवाना झाला.
प्रसंगावधान राखून एका प्रवाशाचा जीव वाचवणाऱ्या संगमेश कलबुर्गी यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या धाडसी कृतीतून कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे.








