बेळगाव : बेंगळुरू आणि गोवा या दोन शहरांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या नियमित सेवेला रविवार, १५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी दोन विशेष फेऱ्यांद्वारे या रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. या नव्या सुविधेमुळे बेंगळुरू-गोवा मार्गावरील प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

शुक्रवारी धावलेली विशेष गाडी क्रमांक ०६५१२ बेंगळुरूहून दुपारी १.३० वाजता रवाना झाली. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे २.५५ वाजता मडगाव येथे पोहोचली.

  • आठवड्यातून सहा दिवस धावणार

नियमित सेवेंतर्गत गाडी क्रमांक २६५५५ यशवंतपूर येथून सकाळी ७.३५ वाजता मडगावच्या दिशेने रवाना होईल. बुधवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध असेल. रात्री ८.५५ वाजता ही गाडी मडगावला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक २६५५६ मडगाव येथून सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि रात्री ९.१५ वाजता यशवंतपूरला पोहोचेल. ही गाडी गुरुवार वगळता इतर सहा दिवस धावणार आहे.

  • महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडणार

या रेल्वेचा मार्ग यशवंतपूर, श्रवणबेळगोळ, हासन, सकलेशपूर, सुब्रह्मण्य रोड, मंगळूर जंक्शन, उडुपी, कुंदापूर, मुकांबिका रोड बैंदूर, मुरडेश्वर, गोकर्ण रोड आणि कारवार असा असून, अखेरचा थांबा मडगाव येथे असेल.

एकूण १६ डब्यांची ही वंदे भारत एक्स्प्रेस एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि चेअर कार अशा सुविधांनी सज्ज असेल. या नव्या रेल्वेसेवेमुळे उडुपी, कोल्हूर येथील मुकांबिका मंदिर, मुरडेश्वर, गोकर्ण, कारवार आणि मडगाव यांसारख्या पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.