- ८६५ गावांच्या महाराष्ट्रातील विलिनीकरणाची मागणी
- सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार
पुणे : बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावांचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा आणि सीमावासीयांच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी १ नोव्हेंबर काळ्या दिनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शांततेत पार पडलेल्या या आंदोलनातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. सीमावासीयांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या लढ्याला पाठिंबा कायम राहील, असा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
आंदोलनाच्या प्रारंभी विश्वनाथ पाखरे यांनी प्रास्ताविकातून सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी आणि आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. १९५६ पासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी मराठी शाळा बंद करण्याचे प्रयत्न, शेतकऱ्यांच्या जमिनींचे प्रश्न आणि मराठी तरुणांवर दाखल होणारे गुन्हे या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाच्या खटल्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी उत्तम तरळे, विजय पाटील, एस. आर. पाटील, उदय पाटील, बाबासाहेब पाटील, रुपेश सुळकर, व्यंकाप्पा पाटील, संतोष पाटील, आराध्या गणपत पाटील आणि हणमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सीमाभागातील मराठी बांधवांचा लढा हा केवळ सीमावासीयांचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या अस्मितेशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे सीमाप्रश्न सुटेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची भावना वक्त्यांनी व्यक्त केली.
कु. आराध्या वैराळ सुळकर हिने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत सादर केल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली. त्यानंतर उपस्थितांनी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून गृहशाखेतील अधिकारी संतोष कोचवाड यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले.
या आंदोलनात गणपत पाटील, सातेरी पाटील, मारुती पाटील, वैराळ सुळकर, अर्जुन वीर, गंगाराम वीर, संतोष कुंभार, नारायण पाटील, शिवाजी चदगडकर, राहुल चन्नेवाडकर, संदीप बिडकर, नितीन कुर्लिंग, भरत पाटील, एम. सी. पाटील, परशराम पाटील, संदीप बर्वे, चंद्रकांत काकडे, मुरलीधर देसाई, किरण राणाप्पा पाटील, सचिन पाटील, भुजंग गोविंद पारखे, पांडुरंग करविनकोप, हरीनंद मिराशी, ज्योतीबा तिनेकर, हेमंत तवर, सिद्धू वाकाले, शिवानंद चन्नेवाडकर, विद्याधर पाटील, मंगेश वंजारी, मानिक पाटील, मोतीलाल बेंद्रे, विठ्ठल पाखरे, ज्ञानेश्वर पाटील, नागराज पाखरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार यांचे सहकारी तसेच सोनालीताई आणि अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते.








