• हुबळी – बेळगाव – पुणे बुलेट ट्रेनची घोषणा
  • रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
  • उत्तर कर्नाटकासह महाराष्ट्राच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला मिळणार चालना

बेंगळुरू : बेंगळुरू-मुंबईदरम्यान हुबळीमार्गे धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर रेल्वेला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या नव्या रेल्वेमुळे उत्तर कर्नाटकातील प्रवाशांना मुंबई आणि बेंगळुरूदरम्यान प्रवासाचा अधिक आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे. याचवेळी बेंगळुरू-हुबळी-पुणे दरम्यान अतिजलद बुलेट ट्रेन मार्गिका विकसित करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. त्यामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील रेल्वे संपर्काच्या दृष्टीने नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

मात्र, रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केलेली हुबळीमार्गे धावणारी वंदे भारत स्लीपर ही स्वतंत्र प्रस्तावित सेवा आहे. सध्या सुरू करण्यात आलेली बेंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर कलबुर्गीमार्गे धावणार आहे. नव्या प्रस्तावित सेवेचा मार्ग हुबळीमार्गे पुणे आणि मुंबईपर्यंत असेल.

बेंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ही १६ डब्यांची असून सुमारे १६ तासांत प्रवास पूर्ण करणार आहे. नियमित सेवेत अनंतपूर, गुंतकल, रायचूर, यादगीर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण येथे थांबे असतील. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.

बुलेट ट्रेनबाबत बोलताना वैष्णव यांनी बेंगळुरू-हुबळी-पुणे मार्गाचा भविष्यातील अतिजलद रेल्वे कॉरिडॉरमध्ये विचार केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. देशात आणखी तीन हजार किलोमीटरच्या बुलेट ट्रेन मार्गिकांची घोषणा करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बेळगावचा या प्रस्तावित मार्गात समावेश होणार का, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नाही.

दरम्यान, बेंगळुरू-मंगळूर दरम्यान येत्या काही आठवड्यांत वंदे भारत चेअरकार सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. या मार्गावरील विद्युतीकरण आणि चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.