- वजनातील फसवणूक आणि दलालांच्या कमिशनवर नाराजी
- अधिकाऱ्यांना धरले धारेवर
बेळगाव : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी विक्रेत्यांकडून वजनात फसवणूक, दलालांकडून अधिक कमिशनची आकारणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे उपलोकायुक्त न्यायमूर्ती बी. वीरप्पा यांच्या पाहणीत निदर्शनास आले. या प्रकारांबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
बाजार समितीतील भाजी विक्रेत्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करताना वजनात फसवणूक होत असल्याचे तसेच दलालांकडून अधिक कमिशन आकारले जात असल्याचे प्रकार समोर आले. घाऊक भाजी विक्रेते विक्रीच्या पावत्या देत नसल्याचेही आढळले. या प्रकारांवर उपलोकायुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

बाजार समितीतील शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प बंद असल्याचे आणि उपाहारगृहात अस्वच्छता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उपाहारगृहाची अवस्था कचराकुंडीसारखी झाल्याबद्दल त्यांनी सचिवांना जाब विचारला. तसेच शेतकरी आणि हमालांसाठी विश्रांतीगृह व वाहनतळाची व्यवस्था नसल्याबाबतही माहिती घेतली.
बाजार समितीतील हमालांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत उपलोकायुक्तांनी कामगार विभागाला दोन दिवसांत बाजार समितीतील सर्व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले. तसेच पात्र कामगारांना शासनाच्या विविध योजनांमधून मिळणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले.

यावेळी त्यांनी बाजार समितीतील स्वच्छतागृहांची पाहणी केली. त्यानंतर शेतकरी भवनाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. बाजार समितीमध्ये स्वच्छता राखण्यासह शेतकरी आणि कामगारांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज या पाहणीतून अधोरेखित झाली.
यावेळी उपनिबंधक अरविंद, लोकायुक्त पोलीस अधीक्षक प्रसन्न देसाई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव के. एन. शिवकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, उपविभागीय अधिकारी श्रवण नायक, महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








