• विणकाम आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

बेळगाव : विणकाम आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांना ‘भारतीय राष्ट्रगौरव २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ग्लोबल पीस कौन्सिल, नवी दिल्ली यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आशा पत्रावळी यांनी विणकाम क्षेत्रात विविध नवनवीन प्रयोग केले असून, विणकाम विषयावर पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थिनी, तरुणी आणि महिलांना विणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी तसेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मदत केली आहे.

समाजाला प्रेरणा देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘भारतीय राष्ट्रगौरव’ पुरस्कार प्रदान केला जातो. सामाजिक सेवा, शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, नवकल्पना, उद्योजकता तसेच कला आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील योगदानाची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतली जाते.

आशा पत्रावळी यांचे कार्य महिलांना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा मार्ग उपलब्ध करून देणारे आहे. त्यांच्या या योगदानामुळे विणकाम कलेला प्रोत्साहन मिळण्यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळत आहे.

त्यांच्या या सन्मानामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.