• वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या २०२ व्या विजयदिनानिमित्त विविध लोककलांचे सादरीकरण
  • मान्यवरांची उपस्थिती

कित्तूर : ब्रिटिश सत्तेविरुद्ध शौर्याने लढा देत विजय मिळवणाऱ्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक विजयाच्या २०२ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कित्तूर महोत्सव २०२६ ला उत्साहात सुरुवात झाली. पारंपरिक कार्यक्रम, लोककलेची सादरीकरणे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला विशेष रंगत आली.

महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून आणण्यात आलेल्या वीरज्योतीचे कित्तूरमधील चन्नम्मा सर्कल येथे आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राज्यध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वीरराणी चन्नम्मा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महोत्सवांतर्गत आयोजित लोककला प्रदर्शनाचे उद्घाटन राजगुरू संस्थान कलमठचे माडीवाल राजयोगिंद्र स्वामीजी, आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलागी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महोत्सवाच्या मिरवणुकीत विविध लोककला पथकांनी पारंपरिक कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री यांनी कोलता वाजवून मिरवणुकीत विशेष रंग भरला. चंडीमेळा, महिला वीरगासे, ईश्वर वेष, गारुडी गोंबे, मीनू नृत्य, महिला डोल्लू कुणिता, चेंदे वादन, कुद्रे कुणिता, कंसाळे, नंदीध्वज आणि पूजा कुणिता यांसह विविध कलापथकांनी सहभाग घेतला.

याशिवाय विविध शासकीय विभागांच्या चित्ररथांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला. या चित्ररथांच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना आणि जनहिताच्या सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. ऐतिहासिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या महोत्सवाच्या प्रारंभामुळे कित्तूरमध्ये उत्सवी वातावरण निर्माण झाले.