- शब्दगंध कविमंडळ संघाच्या ३६ व्या वर्धापन दिनी कवयित्री उर्मिला शहा यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन
बेळगाव : “उर्मिला शहा यांची कविता सामाजिक चौकटीत अडकलेल्या स्त्रीच्या भावनांची कोंडी फोडणारी आणि तिला आत्मभानाची जाणीव करून देणारी आहे. आज समाजात बाह्य देखावा वाढला असून माणूसपण हरवत चालले आहे. जात, धर्म आणि लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत आपण निर्मळ माणूस होत नाही, तोपर्यंत खरी मुक्ती शक्य नाही. कला ही संस्कृती आणि भाषेच्याही आधी जन्मलेली असून ती जगण्याला दिशा देते असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक आणि कवी चंद्रकांत बाबर यांनी केले.

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कविमंडळ संघ, बेळगाव यांच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी कवयित्री उर्मिला शहा यांच्या चौथ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. चंद्रकांत बाबर पुढे म्हणाले, कवितेतील ‘स्व’चा शोध: कलावंताच्या जगण्यातून आणि अनुभवातून त्याची कला परिपक्व होत जाते. उर्मिला शहा यांच्या कवितेत सामाजिक चौकटीत अडकलेल्या स्त्रीची घुसमट, तिची वेदना आणि वयाच्या एका टप्प्यावर झालेली ‘स्व’ची जाणीव समर्थपणे उमटली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. अनिल सामंत पुढे म्हणाले की, “केवळ व्यासपीठावर टाळ्या मिळवण्यासाठी लिहिलेली कविता अल्पजीवी ठरते. ज्या कवितेत अनुभवांचे चैतन्य असते, जी वाचकाच्या अंतर्मनाला भिडून अस्वस्थ करते आणि अर्थाचे विविध पदर उलगडते, तीच खरी जिवंत कविता असते. उर्मिला शहा यांच्या कवितांमध्ये भाषिक शक्यतांचा सुरेख वापर आढळतो. त्यांच्या कविता प्रेम, पाऊस, निसर्ग आणि नात्यांमधील सूक्ष्म भावतरंग प्रभावीपणे टिपतात. या कविता मानवी जीवनाला अर्थपूर्णता देणाऱ्या आहेत. तसेच सीमाभागात शब्दगंध संस्थेने साहित्य चळवळ ३६ वर्षे अविरतपणे जिवंत ठेवल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वागत सुधाकर गावडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी संस्थेच्या आजपर्यंतचा प्रवास आणि विविध उपक्रमांची माहिती करून दिली. परशुराम खेमणे, गुरुनाथ किरमटे आणि स्मिता किल्लेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
उर्मिला शहा यांनी आपल्या मनोगतात आपल्या काव्य लेखणामागची प्रेरणा आणि वाटचाल उलगडून दाखवली. यावेळी प्रा. सुभाष सुंठणकर, डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. आनंद मेणसे, बी. जी. पाटील, शिवाजी शिंदे, अनिल आजगावकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, कवी, रसिक आणि शब्दगंध कविमंडळ संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर यांनी केले तर आभार सोनिया शहा यांनी मानले.








