- फर्निचर, ब्रँडेड कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक
- सुदैवाने जीवितहानी टळली
अथणी : अथणी शहरातील जत रोडवरील ब्रह्मा एंटरप्रायजेस या फर्निचर, ब्रँडेड कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत दुकानातील फर्निचर, महागडे कपडे आणि विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. आगीत एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण दुकानाला वेढले. दुकानातील सोफा, बेड, टीव्ही, फ्रिज, ब्रँडेड कपडे आणि अन्य वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांना वारंवार पाणी आणावे लागले. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले होते.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेच्या वेळी दुकानात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, आगीच्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे.








