- आता पुढील तारखेची प्रतीक्षा
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भातील दावा सर्वोच्च न्यायालयात आज, १६ सप्टेंबर रोजीही सुनावणीला आला नाही. खंडपीठासमोर अनेक खटले असल्याने सीमाप्रश्नाचा क्रमांक आला नाही. त्यामुळे आता पुढील सुनावणीची तारीख निश्चित होण्याची प्रतीक्षा आहे.
गेल्या बुधवारी, ९ सप्टेंबर रोजीही सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाच्या दाव्याची सुनावणी निश्चित होती. मात्र, सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर अनेक खटले असल्याने त्या दिवशीही दावा सुनावणीला आला नव्हता.
त्यानंतर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी पुन्हा दावा मेंन्शन केला होता. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आजही खंडपीठासमोर प्रलंबित असलेल्या इतर खटल्यांमुळे सीमाप्रश्नाचा दावा सुनावणीसाठी घेण्यात आला नाही.
सीमाप्रश्नाच्या सुनावणीसाठी लवकरच पुढील तारीख निश्चित होईल, अशी माहिती ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी दिली. त्यामुळे आता पुढील सुनावणीच्या तारखेकडे सीमाभागाचे लक्ष लागले आहे.








