- हेस्कॉमकडे समस्या सोडविण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवेळी होणाऱ्या वीजखंडित पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विशाल मिर्जे यांची भेट घेऊन वीज समस्येवर सविस्तर चर्चा केली. ग्रामीण भागात वारंवार आणि अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही अडथळे निर्माण होत असल्याचे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
वीजपुरवठ्यातील अनियमितता दूर करून नागरिकांना सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या भेटीदरम्यान एपीएमसीचे माजी सभापती आप्पाजी जाधव, संजय पाटील, महांतेश कोळूचे, किसन सुंठकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.








