- तातडीने भेट देत दिला धीर
- डॉक्टरांना आवश्यक उपचारांच्या सूचना
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दुचाकी अपघातात जखमी झालेल्या बेक्किनकेरी गावचे नेते नारायण बेळगावकर यांच्या पत्नी शांता यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी शांता यांना धीर दिला.
नारायण बेळगावकर हे पत्नी शांता यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. यात शांता जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच हेब्बाळकर यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्यांची विचारपूस केली.
यावेळी हेब्बाळकर यांनी शांता यांच्याशी आपुलकीने संवाद साधत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगून त्यांना धीर दिला. तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडूनही प्रकृतीची माहिती घेतली.
शांता यांना पुढील उपचार व वैद्यकीय तपासणीची आवश्यकता लक्षात घेऊन हेब्बाळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांना रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून जखमीवर तातडीने आवश्यक उपचार व योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
शांता यांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करताना, नागरिक अडचणीत असताना तातडीने मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याचे आमदार हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि कुटुंबीय उपस्थित होते.








