- बेळगावला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी
बेळगाव : नुकतेच बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेले श्री. प्रकाश निकम यांची बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी विविध भागातील लोकप्रतिनिधी, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक-नगरसेविका, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख तसेच मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नूतन पोलीस आयुक्तांना शुभेच्छा देत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
या सदिच्छा भेटीदरम्यान बेळगाव शहरातील विविध महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या विळख्याबाबत उपस्थितांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
- युवा पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात :
बेळगाव शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे युवक-युवती तसेच तरुण पिढी अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे केवळ संबंधित युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त होत नाही, तर त्याचा गंभीर परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. पुढे त्याचे पडसाद समाजव्यवस्थेवरही उमटत असल्याने हा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शालेय व महाविद्यालयीन परिसर तसेच शहरातील काही संवेदनशील ठिकाणी अमली पदार्थांची विक्री व वापर रोखण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त, नियमित तपासणी, गस्त आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच या विषयासाठी संबंधित विभाग, शैक्षणिक संस्था, पालक आणि सामाजिक संस्थांचा सहभाग असलेली प्रभावी समिती व समन्वय यंत्रणा राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
- बोरसे यांच्या काळातील उपक्रमांचा संदर्भ :
यावेळी माजी पोलीस आयुक्त श्री. भूषण गुलाबराव बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या अशाच एका भेटीचा संदर्भ देण्यात आला. त्यावेळीही शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येबाबत चर्चा करून बेळगावला व्यसनमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून या विषयावर विविध उपक्रम व कारवाया राबविण्यात आल्या.
त्याच धर्तीवर नूतन पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनीही अमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेऊन बेळगाव शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
- शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष लक्ष देण्याची मागणी :
अमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांनीही एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच संवेदनशील ठिकाणी विशेष पथके तैनात करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.
- मोबाईलच्या अतिवापराबाबतही आयुक्तांचे मार्गदर्शन :
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही चर्चा झाली. लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या वापराकडे आकर्षित होत आहेत. त्याचा त्यांच्या अभ्यासावर, शारीरिक हालचालींवर आणि सामाजिक जीवनावर परिणाम होत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना शक्य तितका मोबाईलचा अनावश्यक वापर कमी करण्यास प्रवृत्त करावे. त्यांना क्रीडा, मैदानी उपक्रम, अभ्यास आणि विविध सर्जनशील उपक्रमांमध्ये व्यस्त ठेवावे, असे मार्गदर्शन पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी केले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक संस्थांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
- प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून सुरक्षित बेळगाव :
बेळगाव शहरातील अमली पदार्थांचा वाढता धोका, युवकांचे भवितव्य, शालेय व महाविद्यालयीन परिसरातील सुरक्षा, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसह विविध विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
पोलीस प्रशासन आणि शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांमध्ये समन्वय राहिल्यास बेळगाव अधिक सुरक्षित व व्यसनमुक्त करण्यासाठी प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नूतन पोलीस आयुक्त श्री. प्रकाश निकम यांनी उपस्थितांच्या विविध सूचना व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या. शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, रमेश पावले, रणजित चव्हाण पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, रेणू मुतकेकर, माजी नगरसेवक/नगरसेविका राजू बिरजे, सुद्दा भातखंडे, शिवाजी कुडुसकर, मनोहर हलगेकर, वैशाली हुलजी, विजय भोसले, विनायक, प्राचार्य आनंद आपटेकर, सागर पाटील, संजय पाटील, मोतेस बारदेशकर, कपिल भोसले, प्रशांत भातकांडे, महेश मुतकेकर यांच्यासह विविध भागांतील प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
सदिच्छा भेटीनंतर नूतन पोलीस आयुक्तांना शुभेच्छा देत, “बेळगाव शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर व प्रभावी पावले उचलावीत; त्यासाठी नागरिक व विविध संस्था पोलीस प्रशासनाच्या पाठीशी राहतील,” असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.








