- सीसीबी पोलिसांची शहापूर परिसरात कारवाई
- गांजा, दुचाकी व मोबाईलसह १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करून गांजाची विक्री करणाऱ्या टोळीचा बेळगाव सीसीबी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचा पुरवठा केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील आणखी एक संशयित फरार आहे.
अक्षयकुमार अंकलगी, आदर्श हिरेमठ आणि मणिकांत उगरखोडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सीसीबी पोलिसांनी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. यावेळी तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गांजा, एक दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण १.८० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील गांजाचा मुख्य पुरवठादार असल्याचा संशय असलेला मैताब हा फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या या नेटवर्कचा आणखी विस्तार आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.








