- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती
बेळगाव : नैऋत्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यापासून १४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित गाड्यांच्या प्रवासाच्या तारखेपासून सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. विशेषतः पलासा, सोमपेटा आणि इच्छापूरम स्थानकांवरील काही गाड्यांच्या आगमन व प्रस्थानाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती नैऋत्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमाडी यांनी दिली.
- १५ ऑक्टोबरपासून बदलणारे वेळापत्रक
रेल्वे क्र. १५२२७ बंगळूर-मुजफ्फरपूर साप्ताहिक एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपासून रात्री १२:२६ ऐवजी १२:३८ वाजता धावणार आहे. रेल्वे क्र. २२८८६ बंगळूर-हावडा साप्ताहिक एक्स्प्रेसची वेळ १५ ऑक्टोबरपासून सकाळी ७:०२ ऐवजी ७:३५ करण्यात आली आहे.
रेल्वे क्र. १२८६४ एसएमव्हीटी बंगळूर-हावडा दैनिक सुपरफास्ट एक्स्प्रेसही १५ ऑक्टोबरपासून सकाळी ७:४० वाजता धावणार आहे. तसेच रेल्वे क्र. २२८३४ बंगळूर-भुवनेश्वर साप्ताहिक एक्स्प्रेस १३:३६ ऐवजी १३:३८ वाजता सुटेल. रेल्वे क्र. १६२२३ बंगळूर-राधिकापूर साप्ताहिक एक्स्प्रेसची पलासा स्थानकावरील वेळ दुपारी २:०० ऐवजी २:२३ करण्यात आली आहे.
- इतर गाड्यांच्या वेळेतही बदल
रेल्वे क्र. १८०६४ येलहंका-सांतरागाछी साप्ताहिक एक्स्प्रेस १७ ऑक्टोबरपासून सकाळी ५:३५ ऐवजी ६:०० वाजता धावणार आहे. रेल्वे क्र. १६५९७ बंगळूर-अलिपुरद्वार साप्ताहिक अमृत भारत एक्स्प्रेस ७:०३ ऐवजी ७:०५ वाजता सुटेल.
रेल्वे क्र. १६५२३ बंगळूर-बालूरघाट साप्ताहिक एक्स्प्रेस २१ ऑक्टोबरपासून सकाळी ७:०५ वाजता धावणार आहे. रेल्वे क्र. १२५०३ बंगळूर-अगरतळा द्विसाप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस २० ऑक्टोबरपासून सकाळी ७:०५ वाजता सुटणार आहे.
रेल्वे क्र. १८०४८ वास्को-द-गामा-शालीमार अमरावती एक्स्प्रेसची वेळ २० ऑक्टोबरपासून सकाळी ११:३० ऐवजी ११:३२ करण्यात आली आहे. रेल्वे क्र. १२८४६ बंगळूर-भुवनेश्वर साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस १९ ऑक्टोबरपासून १३:३६ ऐवजी १३:३८ वाजता धावेल.
रेल्वे क्र. १८४६४ बंगळूर-भुवनेश्वर दैनिक एक्स्प्रेसच्या पलासा आणि सोमपेटा स्थानकांवरील वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे. रेल्वे क्र. २२८८४ यशवंतपूर-पुरी साप्ताहिक गरीब रथ एक्स्प्रेस १७ ऑक्टोबरपासून रात्री ११:०५ ऐवजी ११:०७ वाजता धावणार आहे.
तसेच रेल्वे क्र. २२८९८ म्हैसूर-हावडा साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस १८ ऑक्टोबरपासून रात्री ११:२७ ऐवजी एका मिनिटाने उशिरा धावणार आहे.
नैऋत्य रेल्वेने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी संबंधित रेल्वेगाडीचे सुधारित वेळापत्रक तपासून घेण्याचे आवाहन केले आहे.








