• शेकडो वर्षांची परंपरा जपत देवीला सुके खोबरे अर्पण
  • कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यातून भाविकांची गर्दी

बेळगाव : तालुक्यातील मुतगा गावात ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या श्री भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या यात्रेत कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.

श्री भावेश्वरी देवीला श्रीफळाऐवजी सुके खोबरे अर्पण करण्याची शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेचे विशेष आकर्षण आहे. भाविकांकडून आजही ही परंपरा श्रद्धेने जपली जात असून, यात्रेदरम्यान मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.

मुतगा आणि खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक संबंधांमुळे या परिसरातील नागरिकांची यात्रेला मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध समित्यांकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

भाविकांनी आपली वाहने निर्धारित ठिकाणीच उभी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन बाहू पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, यात्रेतील पारंपरिक प्रथा कायम ठेवत भाविकांनी देवीला केवळ सुके खोबरेच अर्पण करावे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले आहे.