• भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना मोबदला वाटपाचे काम सुरू
  • जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

बेळगाव : बहुप्रतिक्षित धारवाड – बेळगाव थेट रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली असून, त्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोबदला वाटपाचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले की, धारवाड येथील विशेष भूसंपादन अधिकारी संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप करत आहेत. काही भागातील शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला वाढवून देण्याची मागणी केली आहे.

याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सर्व संबंधितांशी चर्चा करून निश्चित करण्यात आलेला दर वारंवार बदलणे शक्य नाही. मात्र, अधिकारी सातत्याने शेतकऱ्यांशी संवाद साधत असून त्यांना प्रकल्पाची आवश्यकता आणि सद्यस्थिती समजावून सांगण्याचे काम सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करत भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, धारवाड–बेळगाव रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.