- सात तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट
- पाणी जपून वापरण्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवाहन
बेळगाव : यंदाच्या मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्यामुळे बेळगाव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २०.१ टक्के कमी पावसाची नोंद झाली असून, सात तालुक्यांमध्ये पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलाशयांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करण्यास प्राधान्य दिले जात असून, नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यातील जलसाठ्याची सद्यस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, कृष्णा नदीत सध्या ८० ते ९० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून हिप्परगी जलाशयात त्याचा साठा केला जात आहे. आवश्यकतेनुसार जलाशयांमध्ये पाणी साठवून त्यानंतरच पुढे विसर्ग केला जात आहे.
हिडकल जलाशयात सध्या २५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, तेथे १३ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन सुमारे १ टीएमसी पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, अपुऱ्या पावसामुळे मलप्रभा खोऱ्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मलप्रभा जलाशयात सध्या १४ टीएमसी पाणीसाठा असून तो गरजेच्या तुलनेत अपुरा आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास आवक वाढेल आणि त्यानुसार जलाशयात अधिक पाणीसाठा करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेवर पेरणी केली असली तरी पावसाने दडी मारल्यामुळे पिकांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे. सलग दोन ते तीन दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारू शकते, असा विश्वासही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला.








