• हलशी, हलशिवाडी आणि गुंडपी येथील प्राथमिक शाळांमध्ये उपक्रम
  • मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे : चंद्रकांत देसाई

हलशी : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहून मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी हलशी येथील सरकारी मराठी शाळेत करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अकलिपी,वह्या, पेन, पेन्सिल किट व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माऊली सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, अनंत देसाई, प्रमोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच मराठी माध्यमाच्या शाळा सक्षम करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते मिलिंद देसाई यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, गेल्या नऊ वर्षांपासून समितीच्या माध्यमातून तालुक्यातील मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण केले जात आहे. या उपक्रमामागील प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे. समाजातील दानशूर व्यक्ती व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचा सल्ला दिला. तसेच ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक एस. टी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी सह शिशिका वैशाली माळवी, जी व्ही भाले, वीणरसु, शोभा हजारे, शैला कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते.

युवा समितीतर्फे सरकारी मराठी शाळा हलशीवाडी व गुंडपी येथील शाळेमध्येही साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई, विनायक फंडी आदी उपस्थित होते.