• तरुणांनी अंमली पदार्थांना नकार द्यावा – जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

बेळगाव : अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ड्रग्जला ठामपणे नकार देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले. बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित अंमली पदार्थविरोधी जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, अंमली पदार्थांची मागणी कमी झाली तरच या बेकायदेशीर व्यापारावर प्रभावीपणे आळा घालता येईल. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहून समाजातही जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक त्रुटी टाळून काटेकोरपणे तपास करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरात अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाविरोधात ‘सन्मित्र’ मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘अँटी ड्रग्ज कमिटी’ स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला वकील संघाचे अध्यक्ष बी. जे. गंगाई, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी आय. पी. गडाद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.