- सर्पमित्र मल्लिकार्जुन गाणिगेर यांच्या धाडसामुळे वाचला प्राण
बैलहोंगल : येथील नयानगरजवळील मलप्रभा नदीत आत्महत्येच्या उद्देशाने उडी घेतलेल्या एका तरुणीचा जीव सर्पमित्र आणि समाजसेवक मल्लिकार्जुन गाणिगेर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला. त्यांच्या धाडसी कृतीमुळे तरुणीला वेळेत बाहेर काढण्यात यश आले असून, परिसरात त्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नयानगरजवळील मलप्रभा नदीच्या पुलावरून एका तरुणीने अचानक नदीत उडी घेतली. नदीतील पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. परिस्थिती गंभीर असूनही कोणीही नदीत उतरण्याचे धाडस करत नव्हते.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र व समाजसेवक मल्लिकार्जुन गाणिगेर तातडीने घटनास्थळी पोहोचले. कोणताही विलंब न करता त्यांनी नदीत उडी घेत बुडणाऱ्या तरुणीपर्यंत पोहोचून तिला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या धाडसी बचावकार्याबद्दल पोलीस निरीक्षक प्रमोद यलीगार यांनी मल्लिकार्जुन गाणिगेर यांच्या शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले. अशा प्रकारचे समाजसेवक समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन गाणिगेर यांच्या तत्परता, धाडस आणि सेवाभावी वृत्तीमुळे एका तरुणीचा जीव वाचल्याने उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.








