- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यात जनजागृती
- सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी पाठिंबा
पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील लढ्याला बळ मिळावे, या उद्देशाने बेळगाव मराठी पत्रकार संघ आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात सीमाप्रश्नाविषयी जनजागृती करत सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
आषाढी एकादशीनिमित्त सीमाभागातील हजारो वारकरी भाविक पुण्यात येतात. तसेच रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या सीमावासीयांचाही मोठा सहभाग या कार्यक्रमात होता. या निमित्ताने आयोजित सभेत सीमाप्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटला आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील कथित भाषिक अन्याय या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांकडून सह्या घेऊन मोहिमेला व्यापक पाठिंबा देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वनाथ पाखरे यांनी मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील रामचंद्र पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचा आढावा घेत मराठी भाषेवरील कथित गळचेपी, कन्नड सक्ती आणि मराठी भाषिकांवर दाखल होणाऱ्या कथित खोट्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. पुण्यातील युवकांनी आपल्या जन्मभूमीच्या प्रश्नासाठी उचललेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.
खानापूर-बेळगाव मित्र मंडळाचे संस्थापक पीटर डिसोझा यांनी मतभेद बाजूला ठेवून सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी जाग करण्याचे काम सातत्याने सुरू ठेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सीमाप्रश्न हा दोन राज्यांमधील विषय असल्याचे सांगत, उच्चाधिकार समितीच्या अलीकडील बैठकीमुळे सीमालढ्याला नवे वळण मिळाल्याचे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयातील लढा अधिक निकराने लढण्याची गरज असून समाजमाध्यमांवर सीमाप्रश्नाबाबत मते व्यक्त करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची युवकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
उद्योजक मारुती वाणी यांनी सीमालढ्याला नवसंजीवनी देण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. हा लढा कोणत्याही राज्याविरुद्ध किंवा भाषेविरुद्ध नसून सीमावासीयांच्या अस्मितेचा असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक सीमावासीयाने या आंदोलनात सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असेही ते म्हणाले.
दत्ता भेकणे, संदीप घाडी, केदार शिवणगेकर आणि शिवाजी जळगेकर यांनीही सीमालढ्यासाठी पुढाकार घेतलेल्या पुणेस्थित युवकांचे कौतुक करत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सातेरी पाटील आणि गणपती पाटील यांनी केले. यावेळी लक्ष्मण काकतकर, रामचंद्र निलजकर, अरुण वीर, मारुती पाटील, अर्जुन वीर, गंगाराम वीर, प्रशांत गुंजीकर, विनोद वीर, सुधीर शिवणगेकर, शांताराम बडस्कर, सुरेश हलगी, भुजंग पाखरे, विजय सावंत, विठ्ठल सावंत, राजू सावंत, प्रमोद सावंत, शिवाजी पाटील, बाळकृष्ण गुंडप, शंकर गुरव, पुंडलिक पाटील, अतुल काकतकर, श्रीधर पाटील, नारायण पाटील, संतोष रूपन, सतीश रूपन, प्रल्हाद पाटील, सिद्धू वाकाले, कलाप्पा पाटील, विजय गुरव, ज्ञानेश्वर पाटील, श्रीकांत मिराशी, माऊली पठाण, नारायण पठाण, राजू शिंदे, रामचंद्र सबनीस, मानतेश मळक, महेश वाकले, महेश अंग्रोळकर, राजकुमार अंग्रोळकर, निवृत्ती मोरे, व्यंकप्पा पाटील यांच्यासह अनेक सीमावासी उपस्थित होते.








