- अंतिम चाचणी टप्प्यात
- बेळगाव, पुणे, हुबळी – धारवाडच्या प्रवाशांनाही लाभ
- ताशी १८० किमी वेगाची क्षमता
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी देशातील दुसरी ‘वंदे भारत स्लीपर’ रेल्वे अंतिम चाचणी टप्प्यात पोहोचली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही अत्याधुनिक रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, मुंबई–बंगळुरू प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल)ने चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ)च्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही स्लीपर रेल्वे विकसित केली आहे. ग्रे आणि ऑरेंज रंगसंगतीतील ही रेल्वे विशेषतः रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असून, ताशी १८० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.
या स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असून ८२३ प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ११ एसी ३-टियर डबे (६११ बर्थ), ४ एसी २-टियर डबे (१८८ बर्थ) आणि एक फर्स्ट एसी डबा समाविष्ट आहे.
प्रवाशांच्या सुरक्षितता आणि आरामासाठी या रेल्वेमध्ये कमी कंपन व आवाज, आधुनिक शौचालये, डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली, सीसीटीव्ही, पूर्ण वातानुकूलित व्यवस्था, ‘कवच’ सुरक्षा प्रणाली तसेच आपत्कालीन ‘टॉक-बॅक’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मार्गावर बेळगाव, हुबळी-धारवाड आणि पुणे येथील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि बंगळुरूदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे जानेवारी २०२६ मध्ये हावडा–कामाख्या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई–बंगळुरू मार्गावरील ही दुसरी स्लीपर रेल्वे सेवेत दाखल होण्याच्या अंतिम टप्प्यात असून, चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वेकडून तिच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.







