• ग्रामपंचायतीच्या तत्परतेने हटविले झाड
  • काही तासांत रस्ता वाहतुकीसाठी खुला

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चलवेनहट्टी–अगसगे मुख्य रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली. या घटनेमुळे बेळगाव शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र, अगसगे ग्रामपंचायतीच्या तत्परतेमुळे झाड हटवून काही वेळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

मध्यरात्रीच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यावर बाभळीचे मोठे झाड कोसळले. पहाटे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांना तसेच वाहनचालकांना अचानक अडथळा निर्माण झाल्याने मोठी तारांबळ उडाली. झाडामुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच अगसगे ग्रामपंचायत उपाध्यक्ष तथा सदस्य गुंडू कुरेण्णवर यांनी ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी उमेश कांबळे आणि लक्ष्मण कंग्राळकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नांतून रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

पहाटेच्या वेळी संबंधित यंत्रणांशी संपर्क होऊ न शकल्याने काही काळ वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तातडीच्या प्रवासासाठी काही वाहनचालकांना हंदिगनूर- मण्णीकेरे मार्गे वळसा घालावा लागला. रस्ता तातडीने मोकळा केल्याबद्दल प्रवाशांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.