• पंचगंगा नदीची पातळी २२ फुटांवर ; नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ  
  • १० बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून, सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची पातळी सध्या २२ फुटांवर पोहोचली असून, अवघ्या २४ तासांत नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे.

नद्यांमधील वाढलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १० बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये राजाराम बंधाऱ्याचाही समावेश आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून, या भागातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे तसेच पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून किंवा धोकादायक मार्गांवरून प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.