- चिक्कोडी तालुक्यात पुराची धास्ती
- नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
चिक्कोडी : महाराष्ट्राच्या पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता सीमावर्ती चिक्कोडी तालुक्यात दिसून येत आहे. कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत अवघ्या एका दिवसात सुमारे पाच फुटांनी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा एकदा पुराची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरडे पडलेले कृष्णा नदीचे पात्र महाराष्ट्रातील पावसामुळे पुन्हा पाण्याने भरू लागले आहे. पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाट भागात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील सखल भाग आणि नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिकांनीही पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे.








