- महारुद्राभिषेक, भजन व महाआरतीद्वारे बळीराजाच्या समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना
बेळगाव : जिल्ह्यातील पावसाची टंचाई दूर होऊन बळीराजाच्या शेतात समृद्धीचे पाणी वाहावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या ऐतिहासिक श्री कपिलेश्वर मंदिरात विशेष धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले. लोककल्याण, उत्तम पर्जन्यवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी शिवचरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
पहाटे मंदिरात भगवान शिवाच्या पिंडीवर विधिवत महारुद्राभिषेक करण्यात आला. वेदमंत्रांच्या घोषात पार पडलेल्या या धार्मिक विधीनंतर दिवसभर मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती. संध्याकाळी भजन, शिवनामस्मरण आणि पारंपरिक महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
बेळगाव जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून, यंदा पावसाअभावी अनेक भागांतील शेतकरी चिंतेत आहेत. पिकांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा, बळीराजाचे संकट दूर व्हावे आणि सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे, अशी सामूहिक प्रार्थना सकल मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी श्री कपिलेश्वर चरणी केली.
यावेळी सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पावसाची कमतरता आणि शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन या विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. वरुणराजाने लवकरच कृपा करून जिल्ह्यावर समाधानकारक पाऊस पाडावा, अशी सर्वांची मनोमन प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.
या धार्मिक सोहळ्याला सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








