एक सत्वशील, सोशिक, प्रेमळ व कणखर अशा स्वभावाच्या मोनाका महादेव गोरल यांचे गुरुवार (ता. २८) रोजी अकस्मिक निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी दिवस कार्यविधी होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडेसे..
येळ्ळूर : माणसाच्या आयुष्यात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी दिसायला साधी सोपी असली तरी त्यांच्या अंतकरणातील कणखरता आणि करुणेची खोल ऊब सर्व समाजाला कवटाळून टाकते, अशाच शांत, प्रसन्न व निर्मळ स्वभावाच्या माझ्या आईचा जन्म सिद्धेश्वर गल्ली मधील चिट्टी घराण्यात सामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला. आईचे शिक्षण जेमतेमच झाले होते. बालपणापासूनच शेती कामाची आवड असणारी माझी आई. शेवटपर्यंत काळ्या आईची सेवा करत राहिली. एकत्र कुटुंबात वावरत असताना आईची दिनचर्या पहाटे पाच वाजल्यापासूनच सुरू होत होती. उठल्याबरोबर डोकीवरून गोड्या विहिरीचे पाणी आणणे, गोठ्यात जाऊन,जनावरांची सेवा करणे, शेण काढणे, याचबरोबर एकत्र कुटुंबातील सदस्या करिता शंभर एक भाकऱ्या करणे. नंतर मजूर माणसासोबत दिवसभर शेतावर जाणे. संध्याकाळी परत घरी आल्यावर जनावरांची देखभाल करत स्वयंपाक करणे. दूध काढणे असा तिचा दिनक्रम असायचा. घरची कामे करत असतानाच आम्हा सात भावंडांच्या कडे सुद्धा जातीने ती लक्ष घालत होती. सर्वच मुलावर तिने समान प्रेम, काळजी आणि संस्काराची छाया पसरविली. आपल्या तिन्ही सुनाना तिने लेकी सारखीच वागणूक दिली. जावयांना सुद्धा ती मुलाप्रमाणेच मानीत असे. मुलांनी शिकावे मोठे व्हावे अशी तिची मनोमन इच्छा होती. आईचा स्वभाव विलक्षण असा होता. ती कधीही रागावलेली किंवा कधी कोणाशी भांडलेली मी आजवर पाहिलेच नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे, आपल्याला जमेल तितकी दुसऱ्यांना मदत करावी अशी तिची भावना होती. गल्लीतील प्रत्येक व्यक्तीला आऊ व आप्पा अशीच ती हाक मारीत असे. घरी आलेल्या व्यक्ती, पै पाहुण्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ न देणारी ती एक अन्नपूर्णाच होती. प्रत्येकाशी प्रेमाने बोलणारी कधीही न चिडणारी माझी आई शेती आणि जनावरे यांच्यामध्येच शेवटपर्यंत रमली होती. वडिलांच्या प्रत्येक सुख दुःखात आई खंबीरपणे उभी राहिली. नातवंडे व पणतवंडे यांच्यावर ती निर्भेळ प्रेम करीत असे. आयुष्यात कधीही स्वतःचा मोठेपणा न मिरवता शांतपणे प्रत्येकाचे नाते जपत, अगदी चांगले आयुष्य माझी आई जगली अन अचानक 28 मे 2026 रोजी अनंतात विलीन झाली.
आई, तू आमच्यात नसलीस तरी तुझे संस्कार व प्रेम आमच्या प्रत्येक श्वासात आहे. तू आमच्यासाठी केवळ एक व्यक्ती नव्हतीस तर जगण्यासाठीची एक प्रेरणा होतीस. तू नजरेआड झाली आहेस पण तुझ्या प्रेमाचा सुगंध कायम आमच्या हृदयात दरवळत राहील. तुझ्या पवित्रा आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
तुझाच मुलगा – प्रा. सी. एम. गोरल – येळ्ळूर








