• मराठी विद्यार्थ्यांना मातृभाषेत मूल्यशिक्षण देण्यासह रिक्त शिक्षक पदेही भरण्याची मागणी
  • मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा

खानापूर : तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता चौथीसाठी सुरू करण्यात आलेल्या मूल्यशिक्षण विषयाचे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावे तसेच सरकारी मराठी शाळांमधील रिक्त शिक्षक पदांवर तातडीने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूरच्या युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कर्नाटक शालेय शिक्षण विभागाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षण विषयाचा समावेश करून नवीन पाठ्यपुस्तक वितरित केले आहे. मात्र हे पुस्तक केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर, बेळगाव, निपाणी, चिकोडी, रायबाग आदी भागांतील मराठी शाळांनाही हेच पुस्तक पुरविण्यात आले आहे.

पुस्तकातील विविध धडे इंग्रजी आणि कन्नड मिश्रित भाषेत असल्याने मराठी विद्यार्थ्यांना ते समजून घेण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः कन्नड भाषा पूर्णपणे अवगत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयोगी ठरत नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. परिणामी शिक्षकांना प्रत्येक धडा स्वतंत्रपणे मराठीत समजावून सांगावा लागत असून अध्यापनासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यशिक्षण आवश्यक असले तरी ते मातृभाषेत उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे पालक व शिक्षकांचे मत आहे. त्यामुळे शासनाने या पुस्तकाची मराठी आवृत्ती तातडीने प्रकाशित करावी किंवा स्वतंत्र मराठी मूल्यशिक्षण पुस्तक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच तालुक्यातील अनेक सरकारी मराठी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे काही पालक मराठी शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्यास टाळाटाळ करत असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त पदांवर तातडीने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या दोन्ही मागण्या तातडीने मान्य न झाल्यास पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागातून शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना युवा कार्यकर्ते श्री पाटील, बाळकृष्ण पाटील, स्वराज्य पाटील, अतिश फटान, शुभम कांबळे, गणेश बेळगावकर, राम चिखलकर, नामदेव कुट्रे, मुकेश गुरव, शिवा पाटील आदी उपस्थित होते.