बेळगाव : शहरासह परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना हिरेबागेवाडी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून सुमारे २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लक्ष्मण विरूपाक्षी कणबर्गी (वय ३१, रा. अडीवेप्पन अंकलगी, ता. गोकाक) असे आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे, पोलीस उपायुक्त नारायण भरमणी, निरंजन राजे अरस तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. के. होळेंनवर, पीएसआय बी. के. मिटगार, अविनाश यरगोप्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १ जून रोजी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचे अभिनंदन केले आहे.








