कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेचा हा उपक्रम सलग सहाव्या वर्षी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. एस. मोरे होते. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली असून अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केल्याने त्यांना भविष्यासाठी नवी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते आणि सह्याद्री सोसायटीचे संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करता येते. त्याचबरोबर संस्कार, नम्रता आणि मोठ्यांप्रती आदर ही जीवनातील महत्त्वाची मूल्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी विनायक पाटील आणि रविना बसरीमरद यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे त्यांनी सांगितले. गौरवाबद्दल प्रतिक्षा तरवाल हिने विद्यार्थ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित स्पर्धेत डेन्मार्क येथे भारताचे प्रतिनिधित्व करून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रविना बसरीमरद (नागपूर) हिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
याशिवाय सह्याद्री सोसायटीचे नूतन संचालक हर्षवर्धन कोळसेकर यांचाही यल्लापा बेळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास पांडुरंग मोरे, यल्लापा बेळगावकर, विनायक पाटील, सुरेश किणयेकर, मोणापा सुतार, अशोक कडोलकर, शिवाजी जाधव, एम. पी. मोरे, यशवंतराव मोरे, के. डी. यळ्ळूरकर, जोतिबा मोरे, रामचंद्र मोरे, यल्लापा बुरुड, वसंत हेब्बाळकर, शशिकांत गावडे, आशा बाचीकर, रेणुका मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नयन जाधव हिने यशस्वी विद्यार्थ्यांच्या अभिनंदनपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बाबुराव जाधव आणि किशोर पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन निवृत्त शिक्षक के. आर. भाष्कळ यांनी केले. या गौरव सोहळ्याला पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








