- सुवर्ण विधानसौधमध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात अधिवेशन होण्याची चर्चा
बेळगाव : हलगा येथील सुवर्ण विधानसौधमध्ये यंदापासून हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन भरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने स्थानिक पातळीवर तयारी सुरू केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुवर्ण विधानसौधमध्ये हिवाळी अधिवेशन भरविले जात होते. मात्र, अधिवेशन काळात विविध मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण होत होता. त्याचा परिणाम कामकाजावरही होत असल्याचे दिसून आले होते.
गतवर्षी ८ डिसेंबरपासून दहा दिवसांचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कालावधीत विविध संघटना आणि आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले होते. त्यामुळे भविष्यात पावसाळ्यात अधिवेशन भरविल्यास आंदोलनांवर काही प्रमाणात मर्यादा येतील, असा सरकारचा विचार असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर हलगा येथील सुवर्ण विधानसौधमध्ये १३ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने प्राथमिक तयारीला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी दुपारी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, बेळगाव ग्रामीणचे साहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर बी. एम. आणि हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेण्णावर यांनी हलगा बायपास परिसरात पार्किंगसाठी पर्यायी जागांची पाहणी केली.
दरम्यान, याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नसले तरी बेळगावात यंदापासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.








