- सखोल चौकशीनंतर सर्वजण पश्चिम बंगालचे भारतीय नागरिक असल्याचे स्पष्ट
बेळगाव : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर असल्याच्या संशयावरून पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोधमोहीमेत ताब्यात घेण्यात आलेल्या २० हून अधिक जणांची सखोल चौकशीनंतर सुटका करण्यात आली. संबंधित सर्वजण पश्चिम बंगालचे भारतीय नागरिक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
हुबळीहून तीन बसमधून काही संशयित व्यक्ती बेळगावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनीही बांगलादेशी घुसखोर शहरात आल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मोठी तपासणी मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या २० हून अधिक जणांना ताब्यात घेऊन माळमारुती पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी संबंधितांची आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच मोबाईल माहितीची कसून पडताळणी केली.
चौकशीदरम्यान संबंधितांनी आपण पश्चिम बंगालचे रहिवासी असून बेळगावातील शहापूर भागात सुवर्ण व्यवसायाशी संबंधित काम करत असल्याचे सांगितले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी गावी गेल्यानंतर पुन्हा कामानिमित्त बेळगावात परतल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
पोलिस तपासात सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे वैध असल्याचे आढळून आले. अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांचे अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब आढळून न आल्याने सर्वांची सुटका करण्यात आली असून ते आपापल्या कामावर आणि निवासस्थानी परतले आहेत.








