- जागर विवेकाचा कार्यक्रमात अनिल आजगावकर यांचे व्याख्यान
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या प्रेरणेने व प्रगतिशील लेखक संघ आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बेळगांव शाखा यांच्यातर्फे बुधवारी झालेल्या जागर विवेकाचा कार्यक्रमात कॉ. अनिल आजगावकर यांचे महात्मा फुलेंचे नाटक तृतीय रत्न यावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते.
इंद्रजित मोरे यांनी प्रारंभी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह जोतिबा अगसीमनी यांच्या हस्ते व्याख्याते व अध्यक्ष यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
अनिल आजगावकर यांनी आपल्या व्याख्यानात प्रारंभी महात्मा फुले यांचा जीवन परिचय व त्यांचे कार्य यांची माहिती दिली. नाटकावर बोलताना त्यांनी इंग्रजी उर्दू हिंदी नाटककारांच्या नाटकांचा संदर्भ दिला. तिसरे रत्न या नाटकात फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. तसेच अंधश्रद्धा यावरही भाष्य केले आहे, असे सांगितले.
कृष्णा शहापूरकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले, नाटक हे केवळ मनोरंजनाचेच नव्हे तर प्रबोधनाचे माध्यम बनले आहे. महात्मा फुले यांच्या नंतरच्या आचार्य अत्रे, अभिराम भडकमकर यांच्यासारख्या अनेक नाटककारांनी आपल्या नाटकांतून अंधश्रद्धावर प्रहार केले आहे. २१वे शतक हे विज्ञानाचे शतक मानले जाते. पण आज अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी वाढली आहे. लोकांमध्ये ज्यांनी वैज्ञानिक दृष्टी रुजवायची आहे तेच वैज्ञानिक आपण तयार केलेल्या उपग्रह अवकाशात सोडण्यापूर्वी पूजा करतात. मग सामान्यांनी काय धडा घ्यायचा असा प्रश्न उपस्थित होतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे ही आजची खरी गरज आहे.
जोतिबा अगसीमनी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.








