- मराठी अस्मितेचा जागर ; व्याख्यान, काव्य मैफल आणि साहित्यिकांचा मेळावा
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन-२०२६ येत्या रविवारी दि. २४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर येथे पार पडणार आहे. सीमाभागातील मराठी साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन यंदाही आकर्षणाचे केंद्र ठरणार असून तयारीला वेग आला आहे.
संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आणि कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी नुकतीच डी. बी. पाटील कार्यालयात महिला व पुरुष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र मारूती पाटील होते. “हे संमेलन सीमाभागातील मराठी अस्मितेचा हुंकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने ही आपली वैयक्तिक जबाबदारी समजून काम करावे,” असे आवाहन त्यांनी केले.
संमेलनातील ‘लोकनेते कै. अजितदादा पवार सभागृहाचे’ उद्घाटन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते परशराम जोगाणी घाडी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे विराजमान होणार आहेत.
दुसऱ्या सत्रात पुण्याचे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवराय : आजच्या काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे ‘काळजातल्या कविता – आई व बाप’ या विषयावर गेय काव्य मैफल सादर करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी दिली.
बैठकीत स्वागत, प्रसिद्धी, मंडप व्यवस्था, पाहुण्यांचे आदरातिथ्य आणि भोजन व्यवस्था अशा विविध समित्यांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी डी. बी. पाटील, एम. वाय. घाडी, शिवसंत संजय मोरे, रणजीत चौगुले, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर, अरुणा गोजे-पाटील, सविता वेसणे, रोशनी हुंद्रे, स्मिता किल्लेकर आदी उपस्थित होते.








