• बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात हुतात्म्यांना अभिवादन

बेळगाव : पोलीस आयुक्तालय येथे दहशतवाद विरोधी दिनानिमित्त आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजात शांतता, सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्याची तसेच दहशतवाद आणि हिंसाचाराविरुद्ध एकजुटीने लढण्याची शपथ घेतली. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजलीही वाहण्यात आली.

दरवर्षी २१ मे रोजी साजरा केला जाणारा दहशतवाद विरोधी दिन समाजात दहशतवादाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी पाळला जातो. दहशतवाद कोणत्याही धर्म, जाती किंवा विचारसरणीचा प्रतिनिधी नसून तो केवळ भीती, हिंसा आणि अशांतता पसरवणारी अमानवी प्रवृत्ती असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक सौहार्द आणि शांतता आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून देशविघातक शक्तींविरोधात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षण, जागरूकता, संवाद आणि परस्पर विश्वास यांच्या माध्यमातून समाजात शांततेचा संदेश अधिक प्रभावीपणे रुजवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.