- व्यापारी आणि प्रशासन आमनेसामने
बेळगाव : एपीएमसी परिसरातील संडे मार्केटमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. खासगी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि एपीएमसीतील गाळे वाटपाच्या मुद्द्यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, जय किसान प्रायव्हेट मार्केटने एपीएमसी परिसरात उपबाजार सुरू करण्याबाबत अधिकृत प्रस्ताव दिल्यास तो सरकारकडे पाठवला जाईल. अन्यथा एपीएमसीमधील उपलब्ध गाळ्यांचे वाटप करण्याची प्रक्रिया राबवावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
संडे मार्केटमधील खासगी व्यापाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, नियमानुसार गाळ्यांचे वाटप झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.

यावेळी खासगी बाजाराचे प्रतिनिधी अब्दुल करीम बागवान यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडल्या. खासगी बाजाराचे परवाने रद्द झाल्यापासून अनेक व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगत व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा अहवाल सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
व्यापाऱ्यांनी कायदेशीर चौकटीत खासगी जय किसान बाजार सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसेच या बाजारावर अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, एपीएमसी परिसरात सुमारे ७० ते ८० दुकाने रिक्त असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पावसाळ्यापूर्वी ही दुकाने कार्यान्वित करावीत, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांकडून कोणतीही तक्रार नसताना काही एपीएमसी व्यापाऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांवर बाजार व्यवस्थेवर अवलंबून राहण्याचा आरोपही केला.
बैठकीला आसिफ सेठ, मोहम्मद रोशन, राहुल शिंदे, भूषण बोरसे यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी मोहन मन्नोळकर आणि मुज्जम्मिल डोणी उपस्थित होते.








