नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून घेण्यात आलेली नीट यूजी २०२६ परीक्षा रद्द झाल्यानंतर आता फेरपरीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, ही परीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
परीक्षेसंदर्भातील सविस्तर माहिती एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेनंतर पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे देशभरात मोठी चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा परिणाम २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवर झाला आहे.
विद्यार्थी या परीक्षेची वर्षभर तयारी करत असतात. परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांत सोशल मीडियावर कथित ‘गेस पेपर’चे फोटो व्हायरल झाले होते. त्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आल्याने संशय निर्माण झाला होता.
यानंतर एनटीएने संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान काही अनियमितता आणि गैरप्रकार समोर आल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.







