• कार्यालयांवर छापे ; संगणक – कागदपत्रे जप्त

बेळगाव : शिवानंद नीलण्णवर यांच्या कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या छाप्याप्रकरणी तपास अधिक तीव्र झाला असून, प्रशासनाने त्यांच्या अपार्टमेंटमधील तीन कार्यालये तसेच काही भूखंड जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी कार्यालयांतून संगणक, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे तसेच मोठ्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित बॉण्ड्स जप्त केले. शिवानंद नीलण्णवर यांचा मोबाईल फोनही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून, डिजिटल व्यवहारांची माहिती तपासण्यासाठी तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केली. तसेच आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची अधिक माहिती सादर करण्यास सांगत त्यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवबसव नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सध्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

चौकशीदरम्यान सुमारे ३५ हजार गुंतवणूकदार सहभागी असल्याची आणि एकूण व्यवहारांची रक्कम जवळपास २५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, तपास सीआयडी कडे सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात सीआयडीचे विशेष पथक बेळगावात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासात आरबीआय आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून अधिकृत परवानगीशिवाय जनतेकडून निधी गोळा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

प्रशासनाने गोठवलेल्या चार बँक खात्यांमध्ये सुमारे ४०० कोटी रुपये आढळल्याची माहिती असून, उर्वरित निधी कुठे हस्तांतरित झाला याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन आर्थिक व्यवहार होत असतानाही संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास हे व्यवहार कसे आले नाहीत, याबाबतही विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माळमारुती पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर शिवानंद नीलण्णवर यांच्या निवासस्थान आणि कार्यालय परिसरात पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.