• श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांकडून वाहन अडवून पोलिसांच्या ताब्यात

हुक्केरी : तालुक्यात अवैधपणे मांस वाहतूक करणारे वाहन श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध मांस वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर श्रीराम सेनेचे कार्यकर्ते हुक्केरी परिसरात लक्ष ठेवून होते. दरम्यान, संशयास्पद हालचाल करणारे ‘टाटा एस इंट्रा’ वाहन (क्रमांक KA-22-AB-0409) दिसून आले. कार्यकर्त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून ते अडवले. तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याचा दावा करण्यात आला.

घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वाहनासह संबंधित मांस जप्त केले.

यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या कथित गोहत्या आणि अवैध मांस तस्करीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. संबंधितांवर कायद्यानुसार कठोर पावले उचलावीत, असेही त्यांनी सांगितले.या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.