- द्वैवार्षिक निवडणुकीत चुरशीची लढत ; नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या २०२६-२८ या कालावधीसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर झाला असून, अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत ॲड. बी. जे. गंगाई यांनी विजय मिळवला आहे.
एकूण १,७०९ मतदारांनी सहभाग घेतलेल्या या निवडणुकीची मतदान प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत ॲड. गंगाई यांनी बाजी मारत पुढील दोन वर्षांसाठी नेतृत्व मिळवले.
महिला गटातून उपाध्यक्षपदासाठी ॲड. जयश्री एस. माद्रोळी यांनी ८७९ मते मिळवत मोठा विजय संपादन केला. जनरल सेक्रेटरी पदावर ॲड. सचिन शिवन्नावर, जॉईंट सेक्रेटरी पदावर ॲड. प्रशांत पाटील, तर खजिनदार पदावर ॲड. निर्मला पाटील विजयी झाले.
मॅनेजमेंट कमिटीच्या चार जागांसाठी ॲड. अभिषेक तारीहाळ (८७५), ॲड. जी. ए. हिरेमठ (६४४), ॲड. मल्लप्पा होळी (६४१) आणि ॲड. वसंत अक्केनावर (६२७) यांनी विजय मिळवला. तर दीपा मर्डी, राजेश्वरी पाटील आणि ज्योती पट्टणशेट्टी या महिला सदस्य आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या.
निवडणूक अधिकारी डी. ए. तिगडी आणि आर. एन. मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.








