बेळगाव : पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले सफाईचे काम केले जाणार आहे. यासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून १.०५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

सध्या बेळगाव शहरातील नाले कचरा तसेच गाळाने भरले आहेत. पोस्टमन सर्कल येथील नाला प्लास्टिकच्या कचऱ्यांनी भरत असल्याने वारंवार त्याची स्वच्छता केली जाते. तरीदेखील त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्याबरोबरीनेच शहारातील लेंडीनाला कपिलेश्वर कॉलनी नाला, गोवावेस येथील नाला, काँग्रेस रोड येथील नाल्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने टिळकवाडी परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने काँग्रेस रोडवर गुडघाभर पाणी साचले होते. जर नाले सफाई झाले नाही तर पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचू शकते. यासाठी नाले सफाई होणे गरजेचे आहे. बांधकाम व स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. कंत्राटदाराची निवड करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

एकूण १.०५ कोटी रुपयांची निविदा मागविण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत नाले सफाई करण्याकडे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.