चंदगड : बेळगाव शहरातील शाहूनगरच्या एका तरुणाचा तिलारी धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. महम्मद अमीरशा (वय २६) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महम्मद अमीरशा हा दंतवैद्यकीय शिक्षण पूर्ण करून मित्रांसमवेत तिलारी परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी तो धरणात पोहण्यासाठी उतरला असता अचानक बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम राबवण्यात अडचणी आल्या. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे.








