बेळगाव : ऐतिहासिक श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक तसेच वडगाव येथील मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शहरवासीय व नगरसेवकांतर्फे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांचा सत्कार करण्यात आला.

नगरसेवक रवी साळुंके व माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात भेट देत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल यावेळी त्यांचे आभार मानण्यात आले.

त्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यंदाची तब्बल १३ तास चाललेली मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने महिनाभरापासून नियोजनबद्ध बैठका घेत जनजागृती केली होती. त्याचा सकारात्मक परिणाम मिरवणुकीत दिसून आला, अशी भावना व्यक्त करण्यात आली. गेल्या १०७ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली असून यासाठी पोलीस, महानगरपालिका व इतर विभागांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे नगरसेवक रवी साळुंके यांनी सांगितले.

यावर्षी प्रथमच डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी झाल्याने मिरवणुकीत सकारात्मक बदल जाणवला. कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण मिरवणूक सुरळीत पार पडली. मंडळांना शिस्त लावण्याचे काम पोलीस आयुक्तांनी कौशल्याने केले, अशी प्रतिक्रिया मनोहर हलगेकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राजू सावंत, अनंत बिर्जे, जोतिबा शहापूरकर, प्रसाद मुतगेकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.