- जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांची पत्रकार परिषदेत माहिती
- कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या झाल्याचे उघड
बेळगाव : जिल्ह्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन मुख्य आरोपींना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी दिली.
रायबाग तालुक्यातील हनबरट्टी गावातील सत्यव्वा संतोष हेळवी (वय २४) हिच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंबीयांनी तिला विष देऊन ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कृष्ण सहदेव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील नाडीगुडिकेत्र येथील कृष्ण सहदेव पाटील आणि मृत सत्यव्वा हेळवी यांच्यात प्रेमसंबंध होते. सत्यव्वाचे संतोष हेळवी यांच्याशी लग्न झाले असले तरी ती कृष्णासोबत संपर्कात होती. या पार्श्वभूमीवर तिने वेगळे घर बांधले होते. दि. १७ फेब्रुवारी रोजी सत्यव्वा बेलावडी येथे वास्तव्यास होती. दरम्यान, तिच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार यमकनमर्डी आणि रायबाग पोलीस ठाण्यांत नोंदवली होती.
यानंतर तिला शोधून परत आणल्यानंतर कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, २१ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील अरगा गावात असताना सत्यव्वाने पुन्हा प्रियकराकडे जाण्याचा आग्रह धरला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने विष पाजून हत्या केली. त्यानंतर त्याच रात्री अरगा गावातील स्मशानभूमीत मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या कुटुंबातील तिघांना अटक केली आहे. मृताचे काका प्रकाश भीमप्पा हेळवी (वय ४६), भाऊ शानूर सदाशिव हेळवी (वय ३५) आणि मेहुणा कल्लप्पा मयप्पा हेळवी (वय ४०) यांना ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद एफ. मुशापुरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








