- ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त विजेतेपद
बेळगाव : येळ्ळूर (संभाजी गल्ली) येथील मूळ रहिवासी असलेल्या तारीहाळकर कुटुंबातील कु. श्रीशा सुहास तारीहाळकर हिने इंग्लंडमध्ये आपल्या बुद्धिबळ कौशल्याची चमक दाखवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रतिष्ठेच्या ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत १० वर्षांखालील गटात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना श्रीशाने संयुक्त विजेतेपद पटकावले आहे. अवघ्या नवव्या वर्षी मिळवलेल्या या यशामुळे येळ्ळूरसह कोल्हापूर परिसराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
श्रीशाचे वडील सुहास बाबूराव तारीहाळकर हे येळ्ळूर (संभाजी गल्ली) येथील मूळ रहिवासी असून, सध्या नोकरीनिमित्त इंग्लंडमधील लेमिंग्टन शहरात वास्तव्यास आहेत. श्रीशा तेथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच बुद्धिबळाची आवड जोपासत आहे.
लहान वयातच बुद्धिबळाच्या पटावर आपल्या खेळाची छाप पाडणाऱ्या श्रीशाने ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेत १० वर्षांखालील गटात इंग्लंडकडून सहभाग घेत संयुक्त विजेतेपद मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे तारीहाळकर कुटुंबीयांसह येळ्ळूरमधील ग्रामस्थ आणि कोल्हापूर परिसरातील नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्रीशा ही कोल्हापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक बाबूराव मल्लाप्पा तारीहाळकर यांची नात आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तारीहाळकर कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.








