• गणेशोत्सवापूर्वी स्वच्छता, दुरुस्ती आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी

बेळगाव : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना वडगाव मेन रोडवरील चावडी गल्ली कॉर्नर, नाझर कॅम्प परिसरातील बेळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन तलावाची मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (११ ऑगस्ट) पाहणी केली. तलावाची दयनीय अवस्था लक्षात घेता उत्सवापूर्वी तातडीने स्वच्छता व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

गणेशोत्सव काळात या तलावावर मोठ्या संख्येने भाविक आणि गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणार आहेत. त्यामुळे तलावाची स्वच्छता, दुरुस्ती, परिसरातील मूलभूत सुविधा, प्रकाशयोजना आणि भाविकांच्या सुरक्षेचा यावेळी आढावा घेण्यात आला.

विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे, यासाठी संबंधित प्रशासनाने उत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशी मागणी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

तसेच विसर्जनावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि प्रकाशयोजना करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने वेळ न दवडता कामाला सुरुवात करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पाहणीवेळी सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, विकास कलघटगी, मनोहर हलगेकर, ज्ञानेश्वर मन्नूरकर, अमोल देसाई, संजय शिंदे, राजेंद्र बिर्जे, सागर पाटील, महादेव पाटील, शिवराज पाटील, सुनील बोकडे, राजेंद्र बैलूर, भरत नाग्रोळी, उदय पाटील आणि गुणवंत पाटील यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.