- ३० लाखांच्या ४३ दुचाकी जप्त
- कित्तूर पोलिसांची तंत्रज्ञानाच्या मदतीने कारवाई
- चार जिल्ह्यांत दुचाकी चोरी केल्याचे उघड
कित्तूर : आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून कित्तूर पोलिसांनी तब्बल ४३ दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची अंदाजे किंमत ३० लाख रुपये आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, आयपीएस यांनी कित्तूर पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कित्तूरसह जिल्ह्यातील विविध भागांत हिरो होंडा स्कॅल्डोरसह दुचाकी चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना मिळालेल्या माहितीच्या आधारे कित्तूर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर नारायण मनोहर कदम (मूळ गाव निदगल, ता. खानापूर) याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने तब्बल ४३ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ४१ स्टँडर्ड, एक पॅशन आणि एक एचएफ डिलक्स दुचाकीचा समावेश आहे. चोरीची काही वाहने आरोपीने खानापूर तालुक्यातील आपल्या घरात लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले.
- चार जिल्ह्यांत चोरीचे जाळे :
आरोपीने बेळगाव, धारवाड-हुबळी, गदग आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांत दुचाकी चोरल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने बेळगाव जिल्ह्यातून २५, तर बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून ८ दुचाकी चोरल्या होत्या. याशिवाय धारवाडमधून ६, हुबळीतून १, गदगमधून २ आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातून २ दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे.
चोरीच्या दुचाकींपैकी काही वाहने शेजारच्या गावांतील शेतकऱ्यांना कमी किमतीत विकल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे जुनी दुचाकी खरेदी करताना नागरिकांनी वाहनाची कागदपत्रे आणि मालकी हक्काची माहिती व्यवस्थित तपासावी, असे आवाहन एसपी के. रामराजन यांनी केले. कागदपत्रांची पडताळणी न करता वाहन खरेदी केल्यास भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
या कारवाईत अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद बी. गुडगनट्टी, कित्तूर सर्कलचे सीपीआय भारत एस., कित्तूर पोलीस ठाण्याचे पीएसआय जी. जी. हम्पन्नावर, सीबी पथकाचे अधिकारी तसेच शरीप दफेदार, अद्रुश्यप्पा चिक्केरी, नागराज कडगन्नावर, सुनील मुरागोड, बाहुबली आगसिमनी, हणमंत जीवापुर, एम. बी. कुंभार, एम. एस. हल्ली, एम. आर. लमाणी आणि बेळगाव टेक्निकल सेलचे सचिन पाटील यांचा सहभाग होता.
कित्तूर पोलिसांच्या या उल्लेखनीय तपासकार्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, आयपीएस आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी यांनी कौतुक केले.







