खानापूर : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात झालेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेल्या खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. खानापूर येथील प्रथम वर्ग मुख्य दिवाणी व जेएमएफसी न्यायालयाने मंगळवारी (दि. ११) हा निकाल दिला.

२००६ मध्ये खानापुरात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांनी कन्नड व मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणारी तसेच प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचा आरोप पोलिसांनी केला होता. त्यांच्या भाषणानंतर परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनल्याचा दावा करण्यात आला होता. खानापूर तसेच आसपासच्या भागात दगडफेकीच्या घटना घडल्याचेही पोलिसांनी नमूद केले होते.

या प्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक जी. आर. पाटील यांनी ही कारवाई केली होती. भगव्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केल्यासह तत्कालीन कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात रामदास कदम यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता.

या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया तब्बल दोन दशके सुरू होती. सरकारी पक्षाकडून करण्यात आलेले आरोप पुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने रामदास कदम आणि नितीन बानुगडे-पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे २० वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.